Friday, February 5, 2016

न. वा. जोशी जुना झाला...
न. वा. जोशी 
‘डुबूक...’ कृष्णामाईचं पात्र क्षणभर थरथरलं. पाण्याची वर्तुळं एकामागून एक विस्तारत गेली. अन् मग सारं काही शांत. श्रीनृसिंह तीर्थक्षेत्र धोमचा सुंदर घाट. सायंकाळची कातरवेळ. पक्ष्यांचा किलबिलाट. घाटावर मी, पत्नी, माझी मुलगी, दोन भाऊ, काका-काकू व मावसभाऊ...आमच्या दादांच्या अस्थींचं विसर्जन झालेलं. त्या विसर्जित करताना कृष्णामाईचं शांत पात्र थोडावेळ विचलित झालं. अन् सारं काही शांत झालं. दादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही हुंदका न फुटलेल्या माझ्या मनाचा बांध तिथं सुटला. हमसून हमसून रडलो. पत्नीनं शांत केलं. दादांच्या ऐहिक किंवा दैहिक अस्तित्वाचा शेवटचा भागही अस्तित्वाला अर्पण झाला...आता माझा बाप खºया अर्थानं अनंतात विलीन झाला होता...
...आमचे वडील, आमचे दादा- नरहर वामन जोशी जाऊन आता दोन महिने होत आलेत. ऐन दिवाळी पाडव्याला पहाटे त्यांचं निधन झालं. वयोवृद्ध असला तरीही बाप गेल्याचं अपार दु:ख त्यावेळी तर झालं होतंच...पण नातलग, मित्र, परिचितांच्या सांत्वनात त्यावर फुंकर घातली गेली. आज दोन महिने होत आले...पण त्यांच्या आठवणी रुंजी घालताहेत. मूकरूदन सुरूच आहे. दु:खाचा मंद स्वर हृदयात सतत घुमतोय. मध्ये लिहायचा प्रयत्न केला पण नाही लिहू शकलो. आता प्रयत्न करतोय. आमचे दादा कुणी मोठा माणूस नव्हते. एक सर्वसामान्य माणूस. जरी केंद्र सरकारी कर्मचारी असले, तरी फार मोठ्या पदावर नव्हते. जुन्या काळातील छापखान्यात फोटो छपाईसाठी ‘ब्लॉक’ वापरत. ते तयार करणाºयांना ‘ब्लॉकमेकर’ म्हणत. आमचे दादा संरक्षण खात्याची वाहने बनवणाºया एका विभागात ‘ब्लॉकमेकर’ होते. साधी नोकरी. आयुष्यभर प्रमोशन न मिळालेली नोकरी. त्यामुळे अगदी ‘अठराविश्वे दारिद्र्य असलेला ब्राह्मण’ नसले, तरी निम्नमध्यमवर्गीयपण आयुष्यभर चिकटलेले गृहस्थ होते आमचे दादा. अन् आम्ही त्यांचे तीन मुलगे. मी मधला. आयुष्यभर मोजूनमापून, काटकसर करून जगणाºया आमच्या दादांनी हा काटकसरीचा संस्कार मात्र आम्हाला भरभरून दिला. निम्नमध्यमवर्गीय घरांत असते, तशी आमच्याकडेही छोट्या-मोठ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करण्याचा म्हंटला तर गुण (एरवी जगासाठी अवगुणच) आमच्या अंगी आलेला. कारण आम्ही होतोच एका साध्या ‘ब्लॉकमेकर’ची कार्टी...
...म्हणायला उच्च वर्णात जन्माला आलेली. पण धड गरीब नाही, अन् धड उच्चमध्यमवर्गीयही नाहीत, अशा कोमट, गुळमट अवस्थेतच आम्ही लहानाचे मोठे झालो. मन मारून जगणं हेच या अवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण. आमचे दादा मूळचे धोमचे (ता. वाई, जि. सातारा) इथले. आमचे आजोबा पुरोहित (हा जरा प्रतिष्ठित शब्द झाला) खरं तर भिक्षुक. आजोबांकडे मात्र अठराविश्वे दारिद्र्य होतं. ‘पंडितकाका’ म्हणत त्यांना. त्यांना तीन मुलगे आणि तीन मुली. (मधली काही मुले देवाघरी गेली) त्यात आमचे दादा मुलग्यांमध्ये ज्येष्ठ. दोन बहिणींच्या पाठचे. त्यांच्या लहानपणी दोन वेळच्या खायची भ्रांत. भिक्षुकाला शिधा मिळेल, तेव्हा घरात चूल पेटणार. जमिनीचा तुकडा (भातखाचरं) होता. पण तोही अपुरा आणि बेभरवशाचा. त्यामुळे दादांचं बालपण हलाखीतच गेलं. शिक्षणाची आबाळ झाली. त्यांचे चुलत आजोबा वासुकाका जोशी हे त्यावेळी पुण्यातलं कर्तबगार व्यक्तिमत्त्व होतं. लोकमान्य टिळकांच्या जवळच्या मित्रांपैकी एक असे वासुकाका त्या काळात छपाई तंत्रज्ञान शिकण्यासाठी जर्मनी वगैरे पाश्चात्य देशांत जाऊन आले होते. पुण्यात त्यांनी चित्रशाळा नावाचा मोठा छापखाना स्थापला होता. (आता पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर फक्त ‘चित्रशाळा चौक’ उरलाय. तिथं पूर्वी ही चित्रशाळा होती) त्यांनी आमच्या आजोबांची हलाखीची परिस्थिती जाणून आमच्या दादांना पुण्यात शिकण्यासाठी आणलं. पेरुगेट भावे स्कूलमध्ये शिकणं आणि चित्रशाळेत नोकरी असं दादा करू लागले. त्यांना राहण्यासाठी भांडारकर रस्त्यावर चित्रशाळा प्रेसच्या जागेवरील एका चाळीत (८८५, भांडारकर रस्ता, पुणे) घर देण्यात आलं. (त्याला आम्ही पत्र्याचं घर म्हणत असू) आमच्या दादांनी कालांतराने आपले दोन्ही भाऊही पुण्यात आणले...त्यातल्या धाकट्या भावानं आपल्या अंगभूत गुणांनी-मेहनतीनं कालांतरानं (उणीपुरी ५० वर्षे) उत्कर्ष बुक सर्व्हिस, उत्कर्ष प्रकाशन पुण्यात नावारुपाला आणलं. त्यांचं नाव सुधाकर वामन जोशी. सु. वा. जोशी. सध्याचे पुण्यातले जुने-जाणते प्रकाशक व पुस्तकविक्रेते. पण त्यांना अगदी मोक्याच्या क्षणी आमच्या दादांनीच पाठिंबा दिला म्हणूनच ते हे यश मिळवू शकले, हा खरा इतिहास आहे. असो. त्यांची यशोगाथा ही स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
याच दरम्यान मधल्या काकांना टायफॉईड झाला. त्यांची सेवा करताना आमच्या दादांनाही टायफॉईड झाला. त्या काळात उपचार नीट झाले नाहीत. आबाळ झाली. सततच्या तापामुळे दादांना पायोरिया झाला. त्यामुळे त्यांचे सगळे दात काढून टाकावे लागले. ऐन तारुण्यात दात गेल्यामुळे आयुष्यभर कवळी वापरावी लागणार होती. त्या तरुणाची मनोवस्था काय झाली असेल. पुढे आमच्या आईशी दादांचं लग्न ठरलं.(तीही एक प्रदीर्घ कथा आहे) तेव्हा आमच्या आईला हे ठाऊकच नव्हतं की ज्याच्याशी आपलं लग्न ठरतंय, त्याला दातच नाहीयेत. आमच्या आईचे वडील गेलेले. घरी कमावणारं कुणीच नाही. आमच्या आजीला आमच्या आईसह तीन मुली व एक मुलगा. तिथंही दारिद्रयच पाचवीला पुजलेलं. मग काय आईला कोण विचारणार, लग्न ठरवलं गेलं. आमचे दादा-तेव्हाचे जावईबापू आपल्या संभाव्य सासुरवाडीला साखरपुडा वगैरेसाठी कुरोली सिद्धेश्वर (ता. खटाव, जि. सातारा) आले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत डुंबण्याचा मोह झाला. त्यांनी उडी मारली, तेव्हा त्यांची कवळी त्या विहिरीच्या पाण्यात पडली व तळाला गेली. लोकांना सांगणार कसं? तरुण मुलाची, जावईबापूंची कवळी पाण्यात पडलीये म्हणून. मोठीच फजिती. पण सांगावं तर लागलंच. गावकºयांपैकी कुणीतरी ती कवळी काढूनही दिली. तेव्हा आमच्या आईला समजलं, की ज्याच्याशी आपला विवाह होणार आहे, त्याला खरे दातही नाहीयेत. तुम्ही हसाल कदाचित हे सगळं वाचून, पण हे लिहिताना मला हुंदका फुटलाय. कारण एवढा करूण विनोद नियतीनं माझ्या आई-वडिलांच्या बाबतीत अनेकदा घडवलाय. तारुण्यात पदार्पण करणाºया आमच्या तत्कालीन नववधू आईची भावदशा काय झाली असेल त्यावेळी? असं का, या प्रश्नाचं उत्तर मला अजून सापडायचंय.
...तर असे हे आमचे दादा. सामान्य माणसामध्ये असलेले गणावगुण त्यांच्यातही होते. मात्र, आमचे दादा खूप सरळ, खरं तर निरागस होते, हे सांगताना मुलगा म्हणून मी पक्षपातीपणा करत नाहीये. तटस्थपणे विचार केला तर तोच त्यांचा अवगुण होता. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना प्रसंगी त्यांच्या आॅफिसमधल्या सहकाºयांनी फसवलं, आप्तस्वकियांनीही फसवलं. असो. लिहिण्यासारखं खूप आहे. पण लिहिताना खूप हुंदके येताहेत म्हणून थांबतो. मुश्कील आहे पुढे लिहिणं. प्रसंगी लिहीत राहीनच...
...जाता जाता एक सांगतो. आमच्या दादांचं हस्ताक्षर अत्यंत सुरेख होतं. त्यांचं नाव नरहर वामन जोशी असल्यानं ते न. वा. जोशी अशी लफ्फेदार सही देवनागरी आणि मोडीलिपीतही करत. माझ्या शाळेच्या प्रगतिपुस्तकावर त्यांच्या सह्या आहेत. (अगदी पहिली ते दहावीपर्यंतची प्रगतिपुस्तकं मी अजून जपून ठेवलीत) ...खरं तर माझ्या आयुष्याच्याही प्रगतिपुस्तकावर त्यांनी वेळोवेळी त्यांच्या पसंतीची सही केलीच होती. आता यापुढे माझ्या आयुष्यावर या न. वा. जोशीची सही पुन्हा होणे नाही...कारण आता हा माझा बाप इतिहासजमा झालाय. एक ‘न. वा. जोशी’ या ऐहिक जगासाठी ‘जुना जोशी’ झालाय...
- अभय नरहर जोशी